पणजी : गोवा काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी त्यांचा फोन टॅप होत असल्याचा गंभीर आरोप राज्यातील भाजपा सरकारवर केला आहे. माझ्यावर २४ तास लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.ड्रग्स प्रकरणात सरकारवर आरोप केलेल्या कवठणकर यांनी फोन टॅपिंगबद्दल निषेध नोंदविला आहे. ड्रग्स प्रकरणात मी स्पष्टपणे बोलल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. माझा विविध प्रकारे छळ सुरू आहे. सतत २४ तास माझी माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर लक्ष ठेवण्याऐवजी गोव्यातील ड्रग्सच्या व्यवहारावर लक्ष ठेवले असते, तर गोवा ड्रग्समुक्त झाला असता, असा सल्लाही त्यांनी भाजपा सरकारला दिला आहे.सोमवारी सायंकाळी कवठणकर यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे उप अधीक्षक निळू राऊत देसाई यांनी ३ तास चौकशी केली. ड्रग्सप्रकरणी सीआयडीला माहिती देण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. ड्रग्स प्रकरणातील माझ्याकडील माहिती मी सीआयडीला दिली आहे. तसेच महत्त्वाची नावे आणि काही फोन क्रमांकही दिल्याचे ते म्हणाले. वास्तविक मला ३ तास थांबविण्याचे काहीच कारण नव्हते; परंतु या माध्यमातून माझी छळवणूक चालली असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
गोवा काँग्रेस प्रवक्त्याचे ‘फोन टॅपिंग’ ?
By admin | Updated: January 6, 2015 01:22 IST