ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - काश्मिरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना लिहिले आहे. नव्वदच्या दशकामध्ये काश्मिर खो-यात उसळलेल्या दहशतवादामध्ये लाखोंच्या संख्येने काश्मिरी पंडित खो-यातून विस्थापित झाले. ते मोठ्या संख्येने जम्मू किंवा दिल्लीतील विस्थापित शिबिरांमध्ये राहत आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. राजनाथ सिंह यांनी या आश्वासनाचा पाठपुरावा सुरू केला असून अब्दुल्ला यांनी पंडितांसाठी अनुकूल जागा मिळवण्यासाठी सहाय्य करावे अशी सूचना सिंह यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यातच काश्मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून भाजपाने मिशन ४४चे आव्हान पेलले आहे. त्या दृष्टीनेही काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन भाजपाप्रणित आघाडी सरकारसाठी महत्त्वाचे आहे.
दरम्यान, काश्मिरी पंडितांचे स्वतंत्र पुनर्वसन करून त्यांचा स्वतंत्र प्रांत करू नये अशी मागणी पीडीपी या जम्मू व काश्मिरमधल्या दुस-या महत्त्वाच्या पक्षाने केली आहे.