नवी दिल्ली/हाजीपूर : वादग्रस्त वक्तव्ये करण्याची खोड जडलेले नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी बुधवारी पुन्हा तोच प्रमाद करून देशभरातून रोष ओढवून घेतला. सकाळी टीव्ही वाहिन्यांनर सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्याचा राग देशवासीयांपुरता मर्यादित न राहता नायजेरियाच्या भारतातील राजदूतानेही त्यावर टीका केल्यानंतर स्वत: गिरीराज यांनी माफीनामा जारी केला, तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना आपल्याच मंत्र्याला सक्त ताकीद द्यावी लागली. राजीव गांधी यांनी जर नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी जर गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय, अशी मुक्ताफळे गिरीराज सिंग यांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरांमधून जोरदार टीका होत आहे आणि काँग्रेसने तर त्यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीराज यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हाकलावे व देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली. गिरीराज यांच्या या वर्णद्वेषी वक्तव्याचा देशभरातील विविध महिला संघटनांनीही धिक्कार केला. गिरीराज हे केंद्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता राज्यमंत्री आहेत. या वक्तव्यावरून गिरीराज सिंग यांची वर्णभेदी मनोवृत्ती आणि महिलांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असे महिला संघटनांनी म्हटले आहे. गिरीराज यांच्या वक्तव्याबद्दल नवी दिल्लीतील नायजेरियन उच्चायुक्त कार्यालयाने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गिरीराज सिंग यांची वर्णद्वेषी मुक्ताफळे!
By admin | Updated: April 2, 2015 05:19 IST