नाशिक : ठक्कर बझार परिसरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच संशयितांपैकी अभिजीत बाळकृष्ण सातपुते (२८, फ्लॅट नंबर ३, राजेश्वरी अपार्टमेंट, चार्वाक चौक, इंदिरानगर) व धिरज रामेश्वर बहालवार (२६, रा. लाभलक्ष्मी रो-हाउस नंबर ६, गुरुगोविंद कॉलेजजवळ, वडाळा-पाथर्डी रोड) दोघांना सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (दि़१८) पहाटेच्या सुमारास अटक केली़ त्यांच्याकडून गावठी कट्टा व दुचाकी जप्त करण्यात आली असून, तीन संशयित फरार झाले आहेत़सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे यांना गुप्त बातमीद्वारा ठक्कर बजार परिसरात दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शेगर, गोसावी, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हवालदार पळशीकर, रवींद्र पानसरे, पोलीस नाईक मरकड, शेळके, वाघमारे यांनी सापळा रचला़ ठक्कर बझार परिसरात उभ्या असलेल्या दोन संशयितांना पकडताच जवळच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या करिझ्मा दुचाकीवर (एमएच १५, ईजे ६६६३) असलेले तिघे जण फरार झाले़ सातपुते व बहालवार या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा तसेच मिरचीची पूड आढळून आली़ पोलिसांनी या दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ठक्कर बझार परिसरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली़ या दोघांवरही सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे़
ठक्कर बझार परिसरातून गावठी कट्टा जप्त
By admin | Updated: July 19, 2016 01:34 IST