पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी १ नोव्हेंबरला चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.या टप्प्यात मुजफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सीतामढी, शिवहर, गोपालगंज आणि सिवान या सात जिल्ह्यांमधील जागांचा समावेश असून, एकूण ७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ५७ महिला आहेत. यावेळी एकूण १,४६,९३,२९४ मतदार १४,१३९ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील.गेल्या निवडणुकीत ५५ पैकी २६ जागांवर भाजप आणि २४ ठिकाणी संयुक्त जनता दलाने विजय संपादित केला होता. राष्ट्रीय जनता दलाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते, तर तीन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या होत्या. आता मात्र चित्र पूर्ण पालटले आहे. महाआघाडीतील राजदने २६, संजदने २१ आणि काँग्रेसने ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे रालोआच्या वतीने भाजप या टप्प्यात ४२ जागांवर आपल्या उमेदवारांना लढवीत आहे. लोजपा पाच तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसा) प्रत्येकी ४ जागांवर भविष्य अजमावीत आहे. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान
By admin | Updated: November 1, 2015 02:40 IST