ढाका : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) चार सदस्यांना बांगलादेशच्या पोलिसांनी रविवारी रात्री येथे अटक केली. अटक झालेल्यांमध्ये इसिसचा क्षेत्रीय संयोजक शखावतुल कबीर याचा समावेश असून या चौघांकडून लॅपटॉप आणि जिहादी पुस्तिका ताब्यात घेण्यात आली आहे. शखावतुल कबीर वारंवार भारत, पाकिस्तानसह अन्य देशांत जा-ये करायचा.ढाक्याच्या जातराबारी आणि खिलखेत भागात रात्रभर चाललेल्या छापासत्रांत या चौघांना अटक करण्यात आली. इतर तीन जणांची नावे मोहंमद अन्वर हुसेन, मोहंमद रबिउल इस्लाम आणि मोहंमद नजरूल आलम आहेत. या चौघांनीही आपण इसिसचे सदस्य असल्याचे कबूल केले आहे. या चौघांचा उद्देश हा महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्या करून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा होता, असे गुप्तचर उपायुक्त मसुदूर रहमान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
इसिसच्या चौघांना बांगलादेशात अटक
By admin | Updated: January 20, 2015 01:37 IST