चिपळूण : योग्य मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास सभासद मतदार यादीतून थकबाकीदारांची नावे कमी करावी, अशी सूचना को -आॅपरेटिव्ह डेप्युटी रजिस्ट्रार यांनी अर्बन बँकेला केली आहे. याची दखल घेऊन चिपळूण अर्बन बँकेने थकबाकीदारांना नोटिसा धाडल्या आहेत. थकीत रक्कम न भरल्यास त्यांना पुढील होणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली आहे. २९५ सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०१५ पूर्वी होणार आहेत. या निवडणुका ४ गटात घेतल्या जाणार आहेत. अ गटात जिल्हा मध्यवर्ती बँक, सूतगिरणी, साखर कारखाने, तर ब गटात नागरी बँका, १० लाखापेक्षा जास्त भांडवल असलेल्या विकास संस्था, बिगरशेती पतसंस्था, १ कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या नोकरदार पतसंस्था, शासकीय अर्थसहाय घेतलेल्या प्रक्रिया व औद्योगिक संस्था, तालुका खरेदी- विक्री संघ, जिल्हा ग्राहक भांडार, ११ लाख लीटरपेक्षा कमी संकलन करणाऱ्या दूध संस्था व तालुका तसेच जिल्हा संघांचा यामध्ये समावेश आहे. क गटात १ कोटीपेक्षा कमी ठेवी, १० लाखांवरील भांडवल असणाऱ्या संस्था, १ कोटीपेक्षा कमी भांडवल असलेल्या नोकर पतसंस्था, १०० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था, अर्थसहाय्य नसलेल्या औद्योगिक व प्रक्रिया संस्था, हातमाग विणकर, कृषी संस्था, १०० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या उपसिंचन संस्था, पाणी वापर संस्था, १० लाखापेक्षा कमी भांडवलाच्या विकास सोसायट्या, दुग्ध कुक्कुटपालन, मत्स्य व पशुपालन संस्थांचाही यामध्ये समावेश आहे. ड गटात १००पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण व अन्य संस्थांचा समावेश आहे. या चारही गटांच्या टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याने चिपळूण अर्बन बँकेने याबाबतची पूर्वतयारी सुरु केली आहे. थकबाकीदारांना थकीत रक्कम किती आहे ती समजावी व त्यांना ती रक्कम भरण्यासाठी वेळ मिळावा, या हेतूने नोटीस काढून ३१ नोव्हेंबरपर्यंत रक्कम भरण्याबाबतची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, ही थकीत रक्कम न भरल्यास थकीत सभासदांची बँकेच्या मतदार यादीतील नावे कमी केली जाणार आहेत. चिपळूण अर्बन बँकेने काढलेल्या या नोटीसीमुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अनेक संस्थांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. लवकरच सहकार क्षेत्रात होणाऱ्या या निवडणुकीसाठी संस्थांमध्ये आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे. मार्च २०१५पूर्वी या निवडणुकीची प्रक्रिया आटोपणार असल्याने सध्या घाई सुरु आहे.लगबग सुरुयोग्य मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास सभासद मतदार यादीतून थकबाकीदारांची नावे कमी करण्याची को -आॅपरेटिव्ह डेप्युटी रजिस्ट्रार यांनी अर्बन बँकेला केली सूचना.२९५ संस्थांच्या निवडणुका मार्च २०१५ पूर्वी होणार.ड गटात १००पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण व अन्य संस्थांचा समावेश.चिपळूण अर्बन बँकेतर्फे निवडणुकीची पूर्वतयारी सुरु.
थकबाकी भरा, तरच मतदार
By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST