मुंबई : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, अद्याप ४ लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल ठरले आहे. त्यामुळे ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ‘लोकमत’ला दिलेल्या अहवालातून संबंधित विद्यार्थ्यांची संख्या समोर आली आहे. महाराष्ट्रात आधार प्रमाणीकरण फेल झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे (४३,७६८) सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, पालघर, जळगाव, रायगड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार फेल झाले आहेत. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, वर्धा आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ६,००० पेक्षा कमी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये ६,००० ते १०,००० दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल झाले आहे.आधार प्रमाणीकरण झाले नसेल तर विद्यार्थ्यांची सांख्यिकी केंद्र शासनाच्या यूडायस ऑनलाइन प्रणालीत नोंद होत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक योजना व शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक आणि त्याचे ओटीपी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र, आधाराविना विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळू शकत नाही, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड अपूर्णप्रमाणीकरणाची प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड अपूर्ण राहते. मुलांची डुप्लिकेट गणना टाळता येत नाही. तसेच पुढील शिक्षणात प्रवेशासाठी अनंत अडचणी येतात. आधार क्रमांकातील चूक, शाळा व आधारवरील माहितीमध्ये फरक, बँक खात्याशी लिंक नसणे व अपडेट न केलेला डेटा यामुळे व्हॅलिडेशन होत नाही, असेदेखील शिक्षकांनी सांगितले.
जन्म दाखला आणि आधार अत्यंत आवश्यक आहे. आधार बँक खात्याला जोडलेले असले तरच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा लाभ मिळू शकत नाही. - तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना