पणजी : गुरुवारपासून बेपत्ता असलेले सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण चळवळीतील बिनीचे शिलेदार फादर बिस्मार्क डायस यांचा मृतदेह शनिवारी त्यांच्या सांतइस्तेव्ह गावाजवळील मांडवी नदीत तरंगताना आढळला. डायस यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.फादर बिस्मार्क यांचे निधन पाण्यात बुडून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. बड्या कंपन्यांना अंगावर घेणारे फादर बिस्मार्क बेपत्ता झाल्यापासून स्थानिकांतर्फे त्यांचा शोध जारी होता. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ते त्यांचे मित्र गणेश कोळी व डॅरेन वाझ यांच्याशी नदीच्या बांधावर बोलत बसले होते. रात्री ते पोहण्यासाठी नदीत उतरल्याचे त्यांच्या दोन्ही मित्रांनी पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ते नदीत पोहण्यासाठी उतरल्यानंतर तेथून जवळच एका कुटीत त्यांचे मित्र झोपी गेले होते. सकाळी उठल्यावर बिस्मार्क न दिसल्याने, ते आपल्याआधीच गावात गेल्याचा त्यांचा समज झाल्याने, आपणही गाव गाठल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. सांतइस्तेव्ह क्षेत्रातील ‘बाभळ’ येथील मानशीपासून २० मीटरच्या अंतरावर त्यांचा मृतदेह शनिवारी सकाळी नऊ वाजता तरंगताना आढळला. त्यांचा मृत्यू घातपातातून होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
फादर बिस्मार्क यांचा बुडून मृत्यू?
By admin | Updated: November 8, 2015 00:18 IST