Farooq Abdullah on Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर आठवड्याभरापूर्वी वांद्रे येथील त्याच्या घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला होता. लीलावती रुग्णालयात उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशातील रहिवासी असल्याचे समोर आलं असून त्याने चोरीच्या उद्देषाने हे सगळं केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र आता सैफवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी यासाठी बांगलादेशला दोषी ठरवता येणार नसल्याचे म्हटलं आहे. अमेरिकेतही अवैध भारतीय आहेत असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा सुमारे सात महिन्यांपूर्वी मेघालयातील डावकी नदी ओलांडून भारतात आला होता. त्याने पश्चिम बंगालच्या रहिवाशाचे आधार कार्ड वापरून सिमकार्ड खरेदी केले होते. भारतात तो नाव बदलून राहत होता. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर स्थलांतराबद्दल जोरदार चर्चा सुरु झालीय. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी वाद निर्माण केला आहे. एका व्यक्तीच्या कृत्यासाठी आपण संपूर्ण देशाला दोष देऊ शकत नाही, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
"महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे आणि तिथे सगळे जातात. .मी अशा घटनांच्या विरोधात आहे आणि त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो. जर कोणी येऊन सैफ अली खानवर हल्ला केला असेल तर तुम्ही एका व्यक्तीच्या कृतीसाठी संपूर्ण देशाला दोष देऊ शकत नाही. ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, देशावर नाही," असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.
यावेळी अब्दुल्ला यांनी परदेशातील भारतीयांच्या परिस्थितीविषयी बोलताना अमेरिकेत भारतातील बेकायदेशीर स्थलांतरितांचा उल्लेख केला. अमेरिकेत किती बेकायदेशीर भारतीय आहेत? ट्रम्प यांनी आकडेवारी दिली आहे. तुम्ही त्याला काय म्हणाल? माणूस अन्नासाठी सर्वत्र जातो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.