Farooq Abdullah on Pahalgam Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सामान्य नागरिकांपासून ते अनेक नेत्यांपर्यंत अनेकांनी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. अशातच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीदेखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला.
काय म्हणाले फारुख अब्दुल्ला ?
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'मला दुःख वाटते की, आपल्या शेजाऱ्याला अजूनही हे समजत नाही की, त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही 1947 मध्ये पाकिस्तानात गेलो नाही, मग आता का जाऊ? भारताने 1947 मध्येच द्वि-राष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही, कारण देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व एक आहेत.'
आता चर्चा नाही, तर...'पाकिस्तानला वाटते की यामुळे आम्ही कमकुवत होऊ. यामुळे आपण कमकुवत होणार नाही, तर अधिक मजबूत होऊ. पाकिस्तान म्हणत आहे की, चर्चा व्हायला हवी. आता काय चर्चा करणार? मी नेहमीच चर्चेला प्राधान्य द्यायचो. पण, आता चर्चा नाही, न्याय हवाय. आज भारताने बालाकोट नाही, तर पाकिस्तानवर अशी कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. आता सरकारने पाकिस्तानशी अखेरची लढाई लढावी आणि त्यांना जशास तसे उत्तर द्यावे,' असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.