नवी दिल्ली : साध्वी निरंजन ज्योतींची माफी स्वीकारून मनाची विशालता दाखवा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्याने केलेल्या आवाहनाला झुगारत विरोध पक्षांनी राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी बंद पाडले. राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कोणतेही कामकाज होऊ शकले नाही, तर लोकसभेत अनेक विरोधी पक्षांनी साध्वी निरंजन ज्योती यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याच्या मागणीवरून सभात्याग केला. राज्यसभेचे कामकाज चारवेळा तहकूब झाल्यानंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.लोकसभेत साध्वी निरंजन ज्योती मुद्यावर मोदी यांनी दिलेल्या निवेदनावर असमाधान व्यक्त करीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि अन्य काही पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर, लोकसभेत परत येण्याचे आवाहन सरकारने विरोधी पक्षांना केले. काँग्रेस नेमक्या कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली. लोकसभेचे कामकाज बंद पाडण्याचा हा प्रयत्न ‘बूमरँग’ होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मोदींच्या निवेदनानंतर लगेच काँग्रेस, डावे पक्ष, आययुएमएल, बसपा आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहात केवळ अण्णाद्रमुक, बिजद आणि छोट्या पक्षांचे एक दोन सदस्यच बसून होते.काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांनी सभागृहात परत यावे आणि चर्चेत सहभागी व्हावे. अशा वर्तणुकीमुळे बूमरँग होईल. शेवटी जनता अंतिम न्यायाधीश आहे. काही महत्त्वाची विधेयके पारित करावयाची आहेत. विरोध करणारे विरोधी पक्ष सभागृहात परत येतील आणि संसदेचे महत्त्व समजून घेतील, अशी आशा आहे, असे नायडू म्हणाले; परंतु नायडूंच्या आवाहनाचा कसलाही परिणाम झाला नाही आणि संपूर्ण विरोधक सभागृहाबाहेरच राहिले. त्यानंतर १५ मिनिटांनी कामकाज सुरू झाले. पण काही मोजकेच सदस्य उपस्थित असल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संसदेतील कोंडी फुटेना
By admin | Updated: December 6, 2014 00:26 IST