नकली नोट प्रकरण
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
हजाराच्या नकली नोटा चलनात
नकली नोट प्रकरण
हजाराच्या नकली नोटा चलनात आणल्या, नाकारला जामीननागपूर : भिवापूर भागात हजाराच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कृष्णासिंग श्यामबिहारीसिंग (३१) रा. रूई खैरी, असे आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, १ जुलै २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास भिवापूर बसस्थानकासमोर असलेल्या अरविंद मनोहर सुरईकर याच्या चपलांच्या दुकानात कृष्णासिंग गेला होता. त्याने चप्पल घेऊन हजाराची नोट दुकानदाराला दिली होती. चिल्लर नसल्याने हा दुकानदार चिल्लरसाठी बस कंडक्टरकडे गेला होता. कडंक्टरने नोट पाहूनच ती नकली असल्याचे सांगितले होते. लागलीच त्याला दुकानमालकाने लोकांच्या सहाय्याने पकडले होते. याच दरम्यान कृष्णासिंगचा साथीदार रितीश राजपूत (१९) रा. चिचोली चंद्रपूर याने एका हॉटेलमधून मिठाई विकत घेतली होती. त्यानेही हजाराची नकली नोट हॉटेलमालकाला दिली होती. ती नकली असल्याचे लक्षात येताच त्यालाही पकडण्यात आले होते. या दोघांना भिवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एक हजार आणि पाचशेच्या प्रत्येकी तीन नोटा जप्त करून त्यांना भादंविच्या ४८९-बी आणि ४८९-सी, ३४ कलमान्वये अटक केली होती. आरोपींपैकी कृष्णासिंग याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर आहे. राज्य सरकारच्या कारभारावर आणि शासकीय कोषावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर आणि लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले.