बिलासपूर - छत्तीसगडच्या बिलासपूर इथं पलोटी स्कूल सोडियम ब्लास्टमध्ये १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. शाळेत परीक्षा सुरू असताना ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही मुलगी बाथरूमला पोहचली होती त्यावेळी टॉयलेटमध्ये फ्लशचं बटण दाबताच स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली.
माहितीनुसार, कुणीतरी आधीच टॉयलेट सीटवर सोडियम क्लोराइड ठेवले होते. सोडियम क्लोराइड जसं पाणी आणि यूरिनच्या संपर्कात आलं तसं त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली आणि त्यात मुलगी भाजली. मुलीच्या किंकाळ्या ऐकून महिला शिपाई तातडीने बाथरूमच्या दिशेने धावत गेली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना कळताच ते घटनास्थळी पोहचले. अथक प्रयत्नांनी बाथरूमचा दरवाजा तोडून मुलीला बाहेर काढले.
या घटनेवर पालक म्हणाले की, या दुर्घटनेत लहान मुलीचा जीवही गेला असता. शाळा प्रशासनाने संबंधित घटनेची योग्य दखल घेत तात्काळ दोषींविरोधात कठोर कारवाई करावी. जर कारवाई केली नाही तर शाळेविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही पालकांनी दिला आहे. तर आठवीच्या वर्गातील मुलाचा या घटनेमागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेतील जखमी मुलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शाळा प्रशासनाने अद्याप यावर भूमिका स्पष्ट केली नाही.
कसा झाला स्फोट?
शाळेत परीक्षा सुरू होती. शुक्रवारी मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळी जवळपास १० च्या सुमारास ती टॉयलेटला गेली. टॉयलेटमध्ये मुलीने फ्लश दाबताच जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून शाळेत गोंधळ उडाला. शाळा प्रशासनातील कर्मचारी, शिक्षक यांनी जखमी मुलीला टॉयलेटमधून बाहेर काढले. अखेर सोडियम क्लोराइड मुलांना कुठून मिळालं, त्याचा स्फोटासाठी वापर केला जातो हे कसं शिकले, त्याबाबत शाळाही अनभिज्ञ आहे. सध्या पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.