लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तीन नव्या चेहऱ्यांसह पाच जणांचा समावेश आणि एका मंत्र्यास डच्चू देत, सोमवारी फेरबदलासह मंत्रिमंडळ विस्तार केला. अखिलेश मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ही सातवी वेळ आहे.विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मनोज कुमार पांडे यांना मंत्रिपदावरून देण्यात आलेला डच्चू आणि बलराम यादव यांचे पुनरागमन याला आजच्या विस्तार आणि फेरबदलाचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांनी आश्चर्यजनक पाऊल उचलत, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली. आजच्या विस्तारामुळे मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ६० वर पोहोचली असून, हे कमाल प्रमाण आहे. आजच्या विस्तारानंतर अखिलेश मंत्रिमंडळात आता २६ कॅबिनेट दर्जाचे, १२ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २२ राज्यमंत्री आहेत. सपाचे ज्येष्ठ मंत्री शिवपालसिंग यादव यांनी शपथविधीकडे पाठ फिरवली. शिवपालसिंग यांनीच क्युईडीच्या सपातील विलिनीकरणाची घोषणा केली होती. बलराम यादव व नारद राय यांचे मंत्रिमंडळात पुनरागम झाले. या दोघांनीही आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, तर तिसरे कॅबिनेट मंत्री झियाउद्दीन रिझवी हज यात्रेला गेल्याने शपथ घेऊ शकले नाहीत. अखिलेश यांनी लखनौतून रविदास मेहरोत्रा आणि शारदा प्रताप शुक्ला या दोघांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला. मंत्र्यांचे खातेवाटप नंतर जाहीर केले जाणार आहे. शपथविधी सोहळ्यास सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, राज्यसभा सदस्य अमरसिंह आणि राष्ट्रीय सरचिटणीस राम गोपाल यादव यांची उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचे समाजवादी पार्टीतील विलिनीकरण पक्षाच्या विधिमंडळ समितीने रद्द केल्याने, सपाचे ज्येष्ठ मंत्री शिवपालसिंग यादव यांनी आजच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली.
उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार
By admin | Updated: June 28, 2016 05:57 IST