४३ कोटींचा तलाव विस्तारीकरण: पाणी साठवण होणार दुप्पट
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावाच्या सुमारे ४३ कोटी १० लाख रूपये खर्चाच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ सोमवारी रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.
४३ कोटींचा तलाव विस्तारीकरण: पाणी साठवण होणार दुप्पट
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावाच्या सुमारे ४३ कोटी १० लाख रूपये खर्चाच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ सोमवारी रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.९० कोटी रुपये खर्चाच्या श्रीरामपूर शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकार पुरस्कृत यु. आय. डी. एस. एस. एम. टी. योजनेंतर्गत यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. त्यातून पुणतांबा रस्त्यावरील साठवण तलावाचे यापूर्वीच विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर याच योजनेच्या दुसर्या टप्प्यात जुन्या साठवण तलावाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ केला. याप्रसंगी जि.प. सभापती बाबासाहेब दिघे, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. लक्ष्मणराव भोर, डॉ. मुकुंद पोंधे, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र महांकाळे, संजय छल्लारे, दिलीप नागरे, संजय फंड, आशीष धनवटे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेविका राजश्री सोनवणे, संगीता मंडलिक, सुनंदा जगधने आदी हजर होते.नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष अंजूम शेख यांनी योजनेची माहिती दिली. नगरपालिकेने स्वच्छता व पाण्याबाबत चांगले काम केल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. तर या पाणी योजनेनंतर सेवानिवृत्तांची संख्या शहरात वाढून लोकसंख्या वाढीसोबत शहराचा विस्तार होणार असल्याचे जी. के. बकाल यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष ज. य. टेकावडेंच्या काळात जमीन संपादित होऊन अण्णासाहेब शिंदे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या मदतीने हा तलाव पूर्ण झाला. शहराच्या गरजा ओळखून त्यापुढे जाऊन नियोजन केल्याने राज्यात नियमित पाणी पुरवठा करणारी पालिका म्हणून श्रीरामपूरचा लौकिक असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितले. जयंत ससाणे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत काम झालेल्या या तलावाचे विस्तारीकरण राजश्री ससाणेंच्या कारकिर्दीत होत असल्याचे सांगून काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी ससाणे दांपत्याच्या दूरदृष्टीमुळेच शहर विकासाची कामे होत आहेत. काम करायला वेळ लागतो. नावे ठेवायला वेळ लागत नसल्याचे विरोधकांचा नामोल्लेख टाळून सांगितले.अनावश्यक बाबींचा त्याग करावा लागतो. तर अत्यावश्यक बाबी कराव्याच लागतात, असे सांगून रामगिरी महाराज यांनी जल हे जीवन असून पाणी अत्यावश्यक आहे. दूरदृष्टीचे नेतृत्व लाभल्यामुळेच श्रीरामपूरला पाणी मुबलक असून ससाणे दांपत्याच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहराची प्रगती व समृद्धी होत असल्याचे सांगितले. नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. (प्रतिनिधी)