नवी दिल्ली : २००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दप्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती, असा संशोधन अहवाल भारत आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी ‘अमेरिकन जर्नल आॅफ ट्रॉपिकल मेडिसिन अॅण्ड हायजीन’ या मान्यवर वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे.सरकारी आकडेवारीनुसार याकाळात भारतात दरवर्षी सरासरी २०,४७४ व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली व एकूण १३६ मृत्यू झाले. मात्र, प्रत्यक्षात याहून २८२ पटींनी अधिक म्हणजे सुमारे ६० लाख लोकांना या काळात डेंग्यूने ग्रासले, असा दावा या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.डेंग्यूच्या या व्यापक प्रसारामुळे या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर १.१ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा पडला, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. डेंग्यूमुळे झालेली ही आर्थिक हानी भारत अंतराळ संशोधनावर जेवढा खर्च करतो त्याच्या बरोबरीची आहे.वाल्थॅम, मॅसेच्युसेटस् येथील ब्रँडीस विद्यापीठाची स्नेयडर इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ पॉलिसी, नवी दिल्लीतील ‘इनक्लेन ट्र्स्ट इंटरनॅशनल’ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मदुराई येथील ‘सेंटर फॉर रिसर्च इन मेडिकल एन्टॉमॉलॉजी’ यांनी मिळून हा संशोधन अहवाल तयार केला आहे.आतापर्यंत डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांचीच आकडेवारी सरकारी दप्तरात नोंदविली जात असे. याचे संकलन ‘नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसिजेस कन्ट्रोल प्रोग्रॅम’ ही केंद्र सरकारची संघटना करते. त्यानुसार २००६ ते २०१२ या काळात भारतात डेंग्यूची लागण होण्याचे सरासरी प्रमाण २०,४७४ असून या काळात डेंग्यूमुळे झालेले मृत्यू १३६ आहेत. या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक व ब्रँडीस विद्यापीठाचे आरोग्य अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात भारतात ‘क्लिनिकल’ तपासणीतून उघड झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीहून ३०० पट अधिक म्हणजे वर्षाला ६० लाख एवढी होती. तरीही आम्ही अंदाज केलेला हा आकडाही वास्तवाहून कमी असावा असे आम्हाला वाटते. याचे कारण असे की, आम्ही यासाठी तामिळनाडू या राज्यास आधार मानून पाहणी केली. तेथे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत साथीच्या रोगांची निगराणी व नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दरवर्षी डेंग्युचे ६0 लाख रुग्ण
By admin | Updated: October 8, 2014 02:25 IST