भोपाळ : १९८४ सालच्या २ व ३ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाईड या कंपनीत मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे. याचसोबत या कंपनीच्या परिसरात तेव्हापासून पडून असलेल्या व प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ३५० टन कचऱ्याचीही विल्हेवाट अद्याप लावलेली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.या दुर्घटनेत २५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा स्वयंसेवी संस्था एकीकडे करत असताना राज्य सरकार मात्र हा आकडा केवळ ५,२९५ एवढा असल्याचे सांगताना दिसत आहे. भोपाळ वायूगळती दुर्घंटना मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी, आतापर्यंत ५,२९५ एवढ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे सांगितले. तर भोपाळ ग्रूप फॉर इन्फर्मेशन अॅन्ड अॅक्शनच्या कार्यकर्त्या रचना ढिंगरा यांनी हा आकडा २५ हजाराहून अधिक असल्याचे म्हटले आहे. २०१२ सालच्या घोषणेनुसार राज्य सरकारने दुर्घटनेबाबत स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या समितीने १५३४२ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यासाठी १०-१० लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी केली होती. दरम्यान, भोपाळ विषारी वायू गळती कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संसदेने श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे दुर्घटनेस कारणीभूत कंपनीच्या प्रतिमेचे भोपाळमध्ये दहन करण्यात आले. (वृत्तसंस्था)
३० वर्षांनंतरही मृतांचा नेमका आकडा उपलब्ध नाही
By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST