सत्तर फूट मंडईचे अतिक्रमण हटविले
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
सोलापूर : सत्तर फूट भाजी मंडईतील रस्त्यावरील अतिक्रमण बुधवारी सायंकाळी हटविण्यात आले.
सत्तर फूट मंडईचे अतिक्रमण हटविले
सोलापूर : सत्तर फूट भाजी मंडईतील रस्त्यावरील अतिक्रमण बुधवारी सायंकाळी हटविण्यात आले. सत्तर फूट भाजी मंडईत रस्त्यावर विक्रेते बसत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मंडईत जागा असतानाही विक्रेते रस्त्यावर येत असल्यामुळे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावर यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना अतिक्रमण हटविण्याबाबत कळविले आहे. पोलीस आयुक्तांच्या पत्राची गंभीर दखल घेत काळम-पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे अभियंता मोहन कांबळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी सर्व विक्रेत्यांना ध्वनिक्षेपकावरून मंडईत बसण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही बरेच विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून होते. सायंकाळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक येऊन सत्तर फूट भाजी मंडईत धडकले. पथकाने फेरीविक्रेत्यांवर दंडाची कारवाई केली. अतिक्रमण प्रतिबंधक पथकात वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते. सत्तर फूट भाजी मंडईच्या चौकातील रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. आता दररोज दोनवेळा या ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक पथक फिरणार आहे. दिसेल ती फळ विक्रेत्याची हातगाडी व भाजीपाला जप्त करण्यात येणार आहे. अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने विजापूर रस्त्यावर कारवाई केली. आयटीआय परिसरातील अतिक्रमण हटविले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात हे अतिक्रमण काढण्यात आले होते. कारवाई झाली की नंतर लगेच अतिक्रमण करणारे बस्तान बसवित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारवाईत सातत्य राहणार आहे.