Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दंतेवाडा-विजापूर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दलांनी कुख्यात माओवादी सुधीर उर्फ मुरली याच्यासह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. झेराम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या चैतूचाही चकमकीत मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. सुरक्षा दलांनी तीन मृतदेहांसह इन्सास रायफल ३०३ रायफल, १२ बोअरची बंदूक, स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार झाले. दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली मारला गेला. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये टॉप कमांडर मुरलीचाही समावेश असल्याचे सांगितले. मुरली उर्फ सुधीर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी ८ वाजता चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंकडून बराच वेळ गोळीबार सुरू होता. अनेक तासांच्या गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम सुरू केली तेव्हा तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्याकडून विविध शस्त्रे देखील जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक दिवस आधीच ५०० जवान असलेले सुरक्षा दल जंगलात शोधमोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर या चकमकीची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, या कारवाईत नक्षलवादी चैतू उर्फ श्यामही ठार झाल्याचे म्हटलं जात आहे. नक्षलवादी चैतू हा झेराम हल्ल्याचा सूत्रधार होता. गिरी रेड्डी असे नक्षलवादी चैतू उर्फ श्यामचे नाव आहे. तो चैतू उर्फ श्याम दादा या नावाने ओळखला जायचा. नक्षलवादी चैतू हा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. छत्तीसगडमधील नक्षल संघटनेत अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करत होता.
देशातील सर्वात मोठा नक्षलवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. २५ मे २०१३ रोजी नक्षलवाद्यांनी दर्भा येथील झेरामवर हल्ला केला होता. या हल्ल्यात छत्तीगडमधील दिग्गज काँग्रेस नेते महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल यांच्यासह ३० जण मारले गेले होते. चैतू नवीन तरुणांना नक्षल संघटनेत भरती करायचा आणि प्रशिक्षणही द्यायचा. नक्षलवादी चैतूचा शोध दंतेवाडाच नाही तर सुकमा, विजापूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातही घेतला जात होता. अनेकवेळा तो चकमकीतून निसटला देखील होता.