नक्षलग्रस्त भागातील स्थानिकांना रोजगार देणार
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नक्षलग्रस्त भागातील स्थानिकांना रोजगार देणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर : राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध आहे. या संपत्तीचा उपयोग स्थानिक पातळीवरच केला जाईल. त्यासाठी या भागात उद्योगनिर्मिती करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या सभागृहात आयोजित नक्षलग्रस्त भागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलग्रस्त भागात पोलीस विभाग आणि इतर अधिकार्यांच्या प्रयत्नामुळे नक्षल चळवळ कमजोर झाली आहे. ही योग्य संधी साधून या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मितीवर भर देण्याचा शासनाचा विचार आहे.नक्षलग्रस्त भागात असलेल्या खनिज संपत्तीमुळे येथे उद्योजक येण्यास तयार आहेत. त्यांनी उभारलेल्या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाकडून सुरक्षेची हमी व संपूर्ण मदत दिली जाईल. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे फडणवीस म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, खासदार नाना पटोले व अन्य मान्यवर उपस्थित होते.