कर्नाटकच्या बेल्लारी शहरात KMF प्रशासकीय कार्यालयासमोर काही अज्ञातांनी जादूटोणा केला आहे. जे पाहून KMF चे कर्मचारी भयभीत झालेत. ही काळी जादू कुणी आणि कधी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र सध्या KMF कंपनी तोट्यात चालली आहे त्यामुळे कंपनीने अलीकडेच ५० लोकांना शॉर्टलिस्ट करून कामावरून काढले. त्यांच्यापैकीच कुणीतरी हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या ऑफिससमोर घडली आहे.
कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या कार्यालयासमोर काळी बाहुली, एक मोठा भोपळा, एक नारळ, ८ लिंबू, केसर आणि त्यावर लाल सिंदूर होते. हे पाहून कर्मचाऱ्यांना धक्का बसला. ऑफिससमोरील हा फोटो सगळीकडे पसरत आहे. त्यात एका मोठ्या भोपळ्याला पाच खिळे ठोकल्याचे दिसून येते. एका छोट्या यंत्राभोवती दोरा गुंडाळून, नारळात ताबीज पिशवी बांधून, बाहुली ठेवून आणि दुसऱ्या झाकणावर काहीतरी लिहून हे जादूटोणा केला गेला आहे. प्रत्येक वस्तूवर लाल सिंदूर लावला आहे.
भोपळ्यासोबतच लिंबूमध्ये खिळेही ठोकण्यात आले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कार्यालयाजवळ अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. हे जादूटोण्याचे कृत्य या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तसेच सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेतही करण्यात आले, परंतु जादूटोणा करणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत नव्हती किंवा सुरक्षा रक्षकाला कोणीही दिसले नाही. इतका भयंकर जादूटोणा पाहून कर्नाटक मिल्क फेडरेशनमधील कर्मचारी हैराण झाले आहेत.
दरम्यान, कर्नाटक मिल्क फेडरेशन कंपनी सध्या तोट्यात आहे. त्यामुळे त्यांनी ५० कर्मचारी कपात केलेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांपैकी नाराजांनी हे कृत्य केले असावे असा संशय कंपनीचे संचालक प्रभू शंकर यांनी व्यक्त केला. त्याशिवाय अन्य राजकीय लाभासाठी जादूटोणा केला असावा असाही आरोप होत आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून अद्याप समोर काही आले नाही.