ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 03 - नवी दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षा (आप)मध्ये अंतर्गत वाद उफाळून आला होता. हा वाद आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना पार्टीतून निलंबित करण्यात आल्यानंतर संपुष्टात आल्याचे दिसून येते. 
आमदार अमानतुल्लाह खान यांनी कुमार विश्वास यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे एजंट असून आम आदमी पक्ष तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर कुमार विश्वास  हे अमानतुल्लाह खान यांची पक्षातून हकालपट्टी करावी या मतावर ठाम होते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अमानतुल्लाह खान यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, कुमार विश्वास यांच्याकडे राजस्थान प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जवळपास साडेतीन तास सुरु असलेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि कुमार विश्वास यांनी मीडियाला माहिती दिली. 
यावेळी कुमार विश्वास म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. तसेच आश्वासन देतो की, पक्षांमध्ये ज्यावेळी विचार विनिमय करण्याची वेळ येईल, तेव्हा बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. याचबरोबर माझी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.   
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी  कुमार विश्वास भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, कुमार विश्वास यांनी या वृत्ताचे खंडण करत ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.