ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - पुरामुळे पुढे ढकललेल्या जम्मू व काश्मिर आणि झारखंडमधल्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या असून, या निवडणुका कायदा व सुरक्षेच्या प्रश्नापोटी पाच टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये तसेच दिल्लीतल्या ३ जागांसाठीच्या पोटनिवडणुका या नोव्हेंबरच्या महिनाअखेरीस होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २ डिसेंबर, ९ डिसेंबर, १४ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दिवशी अन्य चार टप्प्यांचे मतदान होणार आहे आणि २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
जम्मू व काश्मिरमध्ये विधानसभेच्या ८७ जागांसाठी तर झारखंडमध्ये ८१ जागांसाठी मतदान होणार आहे. जम्मू व काश्मिरमध्ये १०,०१५ मतदान केंद्रे आहेत तर झारखंडमध्ये २४६४८ मतदान केंद्रे आहेत. जम्मू व काश्मिरमध्ये सध्या नॅशनल काँन्फरन्सचे २८, पीडीपीचे २१ काँग्रेसचे १७, भाजपाचे ११ तर अन्य १० आमदार असून भाजपाने देशभरातल्या यशानंतर मिशन ४४ हाती घेतले असल्याने त्यांच्यासाठी ही विशेष निवडणूक ठरणार आहे. तर झारखंडमध्येही सध्या भाजपाचे १८, जेएमएमचे १८, काँग्रेसचे १४, जेव्हीएमचे ११ व अन्य २० आमदार आहेत. झारखंडमध्येही भाजपा बहुमतसाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे. हरयाणा व महाराष्ट्रात चांगलेच यश मिळवलेल्या भाजपाच्या स्टार कँपेनरची म्हणजेच नरेंद्र मोदींची जादू काश्मिर व झारखंडमध्ये चालते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.