- शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये निवडणूक आयोग पाच राज्यांत निवडणुका घेत आहे. मात्र, प्रथमच रॅली, सभा यावर प्रतिबंध आणण्यात आले आहेत. सायकल आणि पदयात्रेलाही परवानगी असणार नाही. आयोगाने केवळ व्हर्च्युअल रॅलीला परवानगी दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, पाच राज्यांत १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही पक्षाला निवडणूक रॅलीला परवानगी नसेल. कॉर्नर सभाही घेता येणार नाहीत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय निवडणूक जिंकल्यानंतर विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत. घरोघरी जाऊन प्रचारासाठी केवळ ५ लोकांची मर्यादा असेल.
१५ जानेवारीपासून समीक्षा १५ जानेवारीनंतर निवडणूक आयोग या राज्यातील परिस्थितीची समीक्षा करून पुढील प्रचारासाठीचा निर्णय घेणार आहे. जर त्यावेळीही कोरोना नियंत्रणात नसेल तर प्रतिबंध पुढेही चालू राहू शकतात.
कशामुळे प्रतिबंध कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो मृत्यूनंतरही निवडणूक आयोगाने प. बंगालमध्ये रॅलींवर प्रतिबंध लावले नव्हते. त्यानंतर कोलकाता हायकोर्टाने राज्यात कोरोना पसरण्यास निवडणूक आयोगाला दोषी ठरविले होते. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोग जपून पावले टाकत आहे. दरम्यान, निवडणूक प्रचाराची वेळही कमी केली आहे.