शिक्षण समितीसाठी ७ रोजी निवडणूक
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
पुन्हा नव्याने प्रक्रिया : ५ तारखेला अर्ज दाखल करण्याची मुदत
शिक्षण समितीसाठी ७ रोजी निवडणूक
पुन्हा नव्याने प्रक्रिया : ५ तारखेला अर्ज दाखल करण्याची मुदतनाशिक : शिक्षण समिती निवडणुकीसाठी राज्य सरकारने आणलेली स्थगिती रद्द करताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी ही निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. अनेक अडचणी आणि राजकीय वादानंतर ४ जुलै रोजी ही निवडणूक घोषित झाली होती, परंतु त्यानंतरही राज्य शासनाकडून यावर स्टे आला होता. परंतु कोर्टात दाखल असलेल्या याचिकेच्या निकालानुसार विभागीय आयुक्तांनी ही निवडणूक ७ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी ५ ऑगस्टला अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. सभापतिपदी अपक्ष संजय चव्हाण आणि उपसभापतिपदी मनसेचे गणेश चव्हाण यांचीच वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी अपर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. यात सभापतिपदासाठी संजय चव्हाण (अपक्ष), योगीता अहेर (कॉँग्रेस), वत्सला खैरे (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा), सुनीता निमसे (राष्ट्रवादी) आणि मीना माळोदे (मनसे) या सात उमेदवारांनी, तर उपसभापतिपदासाठी वत्सला खैरे व योगीता अहेर (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा) आणि गणेश चव्हाण (मनसे) या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पुन्हा याच उमेदवारांची दाट शक्यता आहे.