नवी दिल्ली : ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी चॉपर करारात लाच दिल्याच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने इटली व ट्युनिशिया या दोन देशांना न्यायालयीन विनंतीपत्रे पाठविली आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने यासंदर्भात परवानगी दिल्यानंतर ईडीने कायदेशीर मदतीसाठी दोन देशांना पत्रे पाठविली आहेत. या करारासंदर्भात पहिली दोन पत्रे ट्युनिशिया व इटलीला पाठविण्यात आली आहेत. अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कराराची चौकशी चालू असून या दोन देशांकडून त्याचे तपशील मागविण्यात आले आहेत. हा करार सरकारने गेल्यावर्षीच रद्द केला असून ईडीने मनी लाँड्रिंग कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. ईडीने यासंदर्भात केलेल्या चौकशीनुसार १७० बनावट कंपन्यांनी या करारात भ्रष्टाचाराचे प्रस्ताव तयार केले होते. भारत व परदेशी कंपन्यांच्या या व्यवहारातील तपशील मागविण्यासाठी ही पत्रे पाठविण्यात आली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईडीची दोन देशांना चौकशीची विनंती
By admin | Updated: January 30, 2015 05:55 IST