रायपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शुक्रवारी अटक केली. दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरात चैतन्य यांच्या घरावर छापा मारल्यानंतर त्यांना पीएमएलए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. त्यांना पाच दिवस ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले.
चैतन्य बघेल यांचा आज वाढदिवस आहे. पिता - पुत्र दोघेही एकाच ठिकाणी राहतात. कारवाईच्या वेळी घराबाहेर मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त होता. त्यावेळी पक्षाचे समर्थकही जमले होते. ईडीचे म्हणणे आहे की, घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले.
तपास यंत्रणांचा दुरूपयोग - बघेल
भूपेश बघेल यांनी तमनार तालुक्याचा दौरा केला होता व गावकऱ्यांना पाठिंबा दिला. हे गावकरी कोळसा खाणींसाठी झाडांच्या कत्तलीला विरोध करीत आहेत. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जात आहे. परंतु, आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे व आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत.
आजवरची कारवाईईडीने १० मार्च रोजी चैतन्य बघेल यांच्याविरोधात अशाच प्रकारची छापेमारी केली होती. या प्रकरणात ईडीने जानेवारीमध्ये माजी मंत्री व काँग्रेस नेते कवासी लखमा, रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे मोठे बंधू अनवर ढेबर, माजी आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, भारतीय दूरसंचार सेवा अधिकारी अरुणपती त्रिपाठी व अन्य काही जणांना अटक केली होती.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कारवाईभूपेश बघेल (६३) यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली असून, त्यात म्हटले आहे की, विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ईडी आमच्या घरी आली. रायगढ जिल्ह्यात तमनार तालुक्यात अदानी समुहाच्या कोळसा खाण प्रकल्पासाठी झाडांची कत्तल होत असल्याचा मुद्दा आज उपस्थित करण्यात येणार होता.
विधानसभा कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कारभूपेश बघेल यांच्या मुलावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी छत्तीसगढ विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते चरणदास महंत म्हणाले की, ज्या पद्धतीने ईडी छापे टाकत आहे, ते पाहता आमच्यावर दबाव आणण्याचा आणि आम्हाला, कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.