जम्मू : एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन दिसून येण्याच्या घटना सुरूच आहे. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसून आले. यानंतर सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. या दरम्यान ड्रोन गायब झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जवळपास 9 वेळा ड्रोनच्या कारवाया दिसून आल्या आहेत.
सकाळी साडे चार वाजता दिसले पाकिस्तानी ड्रोनया घटनेबाबत बीएसएफकडून अधिकृत निवेदन आले आहे. सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी पहाटे 4:25 वाजता पाकिस्तानच्या एका छोट्या हेक्साकॉप्टरवर गोळीबार केला. अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर हे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. या गोळीबारानंतर ड्रोन त्वरित माघारी परतले. हे ड्रोन परिसरातील हेटाळणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते, असे आम्हाला वाटते, असे बीएसएफने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये ड्रोन सातत्याने दिसून येत आहेत. गेल्या रविवारी जम्मू एअर फोर्स स्टेशनवर ड्रोनद्वारे दोन स्फोटकांचा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले. सोमवारी सकाळी लष्करी भागात पुन्हा ड्रोन दिसून आला. त्यानंतर जवानांनी गोळीबार केला, परंतु ड्रोन घटनास्थळावरून निघून गेला. यानंतर मंगळवारी पहाटेच्या वेळी लष्करी भागात तीन वेळा ड्रोन दिसला.
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादल - दहशतवाद्यांत चकमकश्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात हंजिन गावात सुरक्षादलाकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येते आहे. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान परिसरात उपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षादलाकडूनही योग्य प्रत्यूत्तर देण्यात आले.