ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची उपराज्यपालांची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजूर केली आहे. दिल्ली विधानसभा बरखास्त झाल्यावर आता दिल्लीत पुन्हा नव्याने विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फेब्रुवारीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठणे त्यांना जमले नव्हते. अपक्षाची मदत घेऊनही भाजपाला सत्ता स्थापनेचा आकडा गाठता येत नव्हता. त्यामुळे दिल्लीतील तिढा कायम होता.
सोमवारी नजीब जंग यांनी दिल्लीतील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेतले होते. यात काँग्रेस, भाजपा आणि आप या तिन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. मंगळवारी सकाळी उपराज्यपाल नजीब जंग यांनी दिल्ली विधानसभा भंग करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती. यानंतर दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपराज्यपालांनी दिलेल्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली.
आता हा प्रस्ताव औपचारिक पूर्ततेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल.
दिल्ली विधानसभा बरखास्त झाल्याने दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका होतील. जानेवारीमध्ये दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.