Delhi Election 2025 PM Modi: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना यमुनेच्या दूषित पाण्याचा वाद पेटला आहे. अरविंद केजरीवालांनी यमुनेच्या दूषित पाण्याचं खापर हरयाणावर फोडल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला आपदा (आपत्ती) म्हणत घणाघाती टीका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीत झालेल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आप-दा म्हणजे आपची होडी यमुनेच डुबणार आहे. आपवाल्यांचं म्हणणं आहे की, दिल्लीला येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात हरयाणातील लोक विषारी पाणी मिसळवत आहेत. हा फक्त हरयाणाचा नाही, तर सर्व भारतीयांचा अपमान आहे."
दिल्ली धडा शिकवेल -पंतप्रधान मोदी
"आपला देश एक असा देश आहे, जिथे पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम चांगले समजले जाते. पराभवाच्या भितीने ते (आप) काहीही बोलू लागले आहेत. मला विश्वास आहे की, दिल्ली असे बोलणाऱ्यांना धडा शिकवेल", अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
"दिल्ली म्हणत आहे की, आता आपत्तीची कारणे चालणार नाही. आपत्तीची खोटी आश्वासने चालणार नाही. इथल्या लोकांनी आता डबल इंजिन सरकार हवे आहे, जे गरिबांसाठी घरे बनवेल, दिल्लीला आधुनिक करेल आणि प्रत्येक घरातील नळाचं पाणी पोहोचवेल. आज दिल्ली म्हणत आहे की, जेव्हा ५ फेब्रुवारी येईल, तेव्हा आपदा जाईल आणि भाजपा येईल", असे म्हणत मोदींनी केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षावर हल्ला चढवला.