गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या 'AI-171' या विमानाला भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण विमान अपघातानंतर संबंधित एजन्सींनी सखोल तपास सुरू केला. दरम्यान, वैमानिकानेच जाणूनबुजून हा अपघात घडवून आणला, असे तर्क समोर आले होते. यासंदर्भात आता, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) गुरुवारी (१२ फेब्रुवारी २०२६) अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
अंतिम निष्कर्ष येणे बाकी - यासंदर्भात स्पष्टिकरण देताना, "या भीषण विमान अपघाताचा सखोल तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. तपास पूर्ण होण्यापूर्वी कुण्याही व्यक्तीला अथवा कारणाला, या दुर्घटनेसाठी जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. काही माध्यमांमध्ये तपास पूर्ण झाल्याचे दावे करत आहेत. मात्र त्या बातम्या केवळ तर्कावर आधारलेल्या आहेत. त्यात तथ्य नाही," असे AAIB ने स्पष्ट केले आहे. तसेच, "या संवेदनशील प्रकरणात नागरिकांनी केवळ अधिकृत निवेदनावरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही तपास यंत्रणेने केले आहे.विमान अपघाताचा तपास, ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. यात 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर', 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर'चा आढावा, तांत्रिक तपासणी आणि हवामानाची स्थिती अशा अनेक बाबींची सखोल पडताळणी करावी लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे सर्व तथ्ये समोर आल्यानंतरच अधिकृत निष्कर्षाची घोषणा केली जाईल, असे AAIB ने स्पष्ट केले. तसेच, तपासाच्या या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे होईल, असेही यंत्रणेने नमूद केले आहे.