धोबीघाट तुटले, पण नळ कायम
By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST
धोबीघाट तुटले, पण नळ कायम
धोबीघाट तुटले, पण नळ कायम
धोबीघाट तुटले, पण नळ कायम हजारो लिटर पाणी दररोज जातेय वाया नागपूर : मेयो रुग्णालयाच्या मागच्या बाजूला इंग्रजांच्या काळात धोबीघाट बांधण्यात आला होता. घाटावर आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नंतर नळही जोडून देण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी धोबीघाट तोडण्यात आला. परंतु त्यावरील नळाचे कनेक्शन मात्र अजूनही बंद झालेले नाही. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या नळावरून परिसरातील लोक पाणी भरतात. परंतु नळाला तोटी नसल्याने दिवसभर पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरात पाणी साचल्याने स्थानिकांनाही त्रास होत आहे. वाया जात असलेले पाणी रोखण्यासाठी येथील काही नागरिकांनी नळाला तोटी लावण्याची मागणी केली आहे. काही जणांनी तर नळ कनेक्शन बंद करण्याची मागणी केली आहे. हा नळ महापालिकेचा असून, तो सार्वजनिक आहे. मनपाच्या निर्देशानुसार ओसीडब्ल्यू हा नळ बंद करू शकते. परंतु याकडे कुणाचेच लक्ष नाही. शहरातील अनेक भागांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत या भागात हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. यासंबंधात माजी उपमहापौर जैतुनबी अन्सारी यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रार केली आहे. परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. परिसरात पाणी साचून असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे. दुर्गंधीसुद्धा परत आहे. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. बॉक्स.. पाण्याची नासाडी तातडीने थांबवा धोबीघाट परिसरात सुरू असलेली पाण्याची नासाडी तातडीने थांबविण्यात यावी. तसेच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत सक्रिय भूमिका बजावण्याची गरज आहे. धोबीघाटच राहिला नाही तर मग नळ कशाला हवा. येथील नागरिक नळाचा वापर करीत असतील तर नळावर तातडीने तोटी लावून नळ सुधारण्यात यावा आणि पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नगरसेवक तनवीर अहमद यांनी केली आहे.