नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांसाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांना हवा असलेला लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा कमांडर पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात मारला गेला.
शनिवारी संध्याकाळी पंजाबच्या झेलम भागात झिया-उर-रहमान ऊर्फ नदीम ऊर्फ अबू कताल ऊर्फ कताल सिंधी याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्याच्या सुरक्षा रक्षकालाही ठार मारण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी शेजारच्या देशाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सांगितले.
तो२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा सर्वात विश्वासू साथीदार होता. ४३ वर्षीय कताल हा जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील मुख्य हँडलर होता.
रहमानने २००० च्या सुरुवातीला जम्मू प्रदेशात घुसखोरी केली होती आणि २००५ मध्ये तो पळून गेला होता.
केले हे हल्ले...९ जून २०२४ रोजी रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून परतणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या बसवर झालेला हल्ला हा अबू कतालनेच घडवून आणला होता.या हल्ल्यात नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर ४१ जण जखमी झाले होते. यासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता, असे सूत्रांनी सांगितले.