लेण्याद्रीला भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
बैलगाडा शर्यतीऐवजी संगीत भजन स्पर्धा संपन्न
लेण्याद्रीला भाविकांची मांदियाळी
बैलगाडा शर्यतीऐवजी संगीत भजन स्पर्धा संपन्न लेण्याद्री : न्यायालयाच्या निर्बंधामुळे श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे गणेशजयंतीच्या औचित्याने भरविण्यात येणार्या बैलगाडा शर्यती यंदा रद्द करण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम यात्रेच्या गर्दीवर झाला. तरी गणेशभक्तांनी मात्र श्री गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गणेश लेणीतील गिरिजात्मकाच्या मूर्तीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे श्री गिरिजात्मकास धार्मिक विधी, पूजा, अभिषेक लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. हभप नामदेवमहाराज वाळके यांचे गणेशजन्माचे कीर्तन आयोजित करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून श्री गणेशजन्माचा कार्यक्रम झाला. देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय वर्हाडी, सचिव गोविंद मेहेर, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त बाजीराव कोकणे, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, काशिनाथ लोखंडे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कै लास लोखंडे, रोहिदास बिडवई आदी मान्यवरांसह परिसरातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रतिवर्षी घेणार्या बैलगाडाशर्यती न भरविण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला होता. त्याऐवजी संगीत भजनाच्या जिल्हापातळीवर संगीत भजनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात भजनी मंडळांनी सहभाग घेऊन सुश्राव्य संगीत भजनाच्या रचना सादर करून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. जयंतीच्या औचित्याने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नामदेव महाराज वाळके यांच्या कीर्तनाने शनिवार दि. २४ रोजी होणार आहे. फोटो - लेण्याद्रीच्या गिरिजात्मकास गणेशजयंतीच्या औचित्याने करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट. लेण्याद्रीत गणेशलेणीत गणेशजन्माच्या पारंपरिक सोहळ्यात सहभागी देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे व गणेशभक्त.