नामपूर येथे बस आगार कार्यान्वित करण्याची मागणी
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
नामपूर : मोसम खोर्याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नामपूर येथे बस आगार कार्यान्वित करण्याची मागणी
नामपूर : मोसम खोर्याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बागलाण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून नामपूरची ओळख आहे. परिसरातील ४० ते ४५ खेड्यांचा सहवास शहराला लाभल्यामुळे मोसम खोर्याची प्रमुख व्यापारी बाजारपेठ म्हणून नामपूर विकसित होत आहे. भविष्यातील तालुका म्हणूनही शहराकडे बघितले जाते. सुखसुविधांच्या उपलब्धतेमुळे शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी दळणवळणाच्या साधनाअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सटाणा व मालेगाव आगाराच्या बसफेर्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने शहरात प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी आगाराची निर्मिती होणे काळाची गरज आहे.शहरात वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल, मराठी प्राथमिक शाळा असून, हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी नामपूर येथून ये-जा करीत असतात. परंतु विद्यार्थ्यांसाठी मुबलक प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कोंबलेल्या मेंढराप्रमाणे दैनंदिन प्रवास करावा लागतो. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, बँका, कांदा व डाळींब मार्केट आदि ठिकाणी नागरिकांचा दैनंदिन संबंध येत असल्यामुळे बसस्थानक नेहमीच गर्दीने फुललेले असते; परंतु बसस्थानकात वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यांच्या तक्रारी असून बसस्थानकाच्या विकासासाठी आगाराची तातडीने निर्मिती करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संभाजीराव सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा साहेब सावंत, ज्येष्ठ पत्रकार शरद नेरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, युवानेते भाऊसाहेब अहिरे, माजी सरपंच जगदीश सावंत, ग्रा. प. सदस्य प्रमोद सावंत, संजय सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख समीर सावंत, महिला राष्ट्रवादी अध्यक्षा ॲड. रेखा शिन्दे, छावाचे विनोद सावंत, अशोक पवार, अमोल पाटील, नितीन नेर, शरद सावंत आदींनी दिला आहे. (वार्ताहर)--------