नवी दिल्ली : निमलष्करी दल जवानांच्या उपस्थितीत शिव विहार परिसरात अंत्यविधी केले जात आहेत. राहुल सोलंकी नावाच्या युवकाच्या अंत्ययात्रेवेळीही मोठा बंदोबस्त देण्यात आला होता.राहुल एलएलबीचा विद्यार्थी होता. दूध खरेदी करण्यासाठी तो सोमवारी घराबाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. समोरून मोठा जमाव येत असल्याचे पाहून, त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचवेळी त्याच्या मानेला गोळी लागली आणि तो कोसळला. नक्की गोळी कुणी मारली, हे काही समजले नाही. अतिशय भयानक क्षण त्यावेळी होता, असे मित्राने सांगितले.परिसरात तणाव असल्याने अत्यंविधीसाठी संरक्षण मिळावे, अशी मागणी राहुलचे वडील हरी सिंग सोलंकी यांनी केली होती. त्यानुसार निमलष्करी दलाच्या जवानांच्या उपस्थितीत राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळेच जमाव अधिक हिंसक झाला. शिव विहार परिसरात अद्यापही दुकाने बंद आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी अंत्यविधीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची लोकांना भीती वाटत आहे.
Delhi Violence: ‘त्या’ तरुणाचा बंदोबस्तात अंत्यविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:19 IST