Arvind Kejriwal : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पक्षासह (आप) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपला फक्त शिवीगाळ करून ही निवडणूक जिंकायची आहे. आम्ही जिथे जात आहोत, तिथे आमच्या १० वर्षांच्या कामाच्या जोरावर मते मागत आहोत. पण भाजपवाले म्हणत आहेत की, आम्ही एवढ्या शिव्या दिल्या. ते शिव्या देऊन मतं मागत आहेत.
दिल्लीत विधानसभा निवडणुकापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एक घोषणा केली. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, लोकांना मिळालेल्या चुकीच्या पाण्याच्या बिलांची चिंता करण्याची गरज नाही. दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर जी चुकीची बिले आली आहेत, ती माफ करू. दिल्लीतील ज्यांची पाण्याची बिले चुकीची आहेत, त्यांनी पाण्याची बिले भरू नयेत. २०२५ मध्ये आमचे सरकार आल्यावर आम्ही चुकीचे पाणी बिल माफ करू, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
काँग्रेसबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, काँग्रेसने जनतेपर्यंत पोहोचणे बंद केले आहे. काँग्रेस आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. दरम्यान, पंजाबमधील काही महिला आज दिल्लीत आल्या आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत. पंजाबमधील आप सरकारने राज्यातील महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. आपने पंजाबमध्ये दिलेले आपले आश्वासन मोडले आहे, असे महिलांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी (दि.३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आणि आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपला आपत्ती संबोधत म्हटले की, गेल्या १० वर्षांत दिल्ली सरकारने दिल्लीला भयंकर संकटात ढकलले आहे. तसेच, यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी लोकांना आश्वासन दिले की, येत्या काही वर्षांत दिल्लीतील हजारो लोकांना घरांचे पुन्हा वाटप केले जाईल.