Delhi Election Results 2025 : पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेले, "'आपदा' वाले, आपल्यावरील उपचार, आपली रुग्णालये आणि आपल्या मेडिसीनमध्येही घोटाळा करत आहे," हे विधान आणि निवडणूक काळात 'आप'च्या दिशेने सोडलेले काही 'शब्दरूपी बाण', आज 'आप'च्या नेत्यांना नक्कीच आठवत असतील. महत्वाचे म्हणजे, या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीत, ज्या पक्षाने 'आम आदमी पार्टी' असे नाव धारण करून स्वतःला सर्वसामान्य लोकांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाचा तो प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपदा', असा उल्लेख करून एका झटक्यात हाणून पाडला.
'आपदा', 'शीशमहल' आणि 'कट्टर बेईमान' सारखे शब्दरूपी बाण सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावर जे हल्ले केले, त्याचा परिणाम आजच्या निकालात दिसत आहे. भाजपचा दिल्लीचा वनवास संपुष्टात येताना दिसत आहे. भाजपला 1993 नंतर पहिल्यांदाच स्पष्टच बहुमत मिळताना दिसत आहे. आधी काँग्रेस आणि नंतर आपची सत्ता संपवायला भाजपला तब्बल 32 वर्ष लागले.
पीएम मोदींनी वारंवार 'आपदा' असा उल्लेख केला -दिल्ली विधानसभा निवडणुकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आम आदमी पक्षावर हल्ला करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पंतप्रधान मोदींनी 'आप'चा उल्लेख 'आपदा' असा केला. आपल्या भाषणांमधून मोदी वारंवार म्हणाले की, दिल्ली 'आपदा'च्या विळख्यात आहे. गेल्या आठवड्यातच संगम विहार येथील रॅली दरम्यान मोदी म्हणाले होते, "'आपदा' पक्षाचा मुखवटा फाटला आहे. 'आपदा' वाले आपल्या उपचारात, आपल्या रुग्णालयात आणि आपल्या औषधांमध्येही भ्रष्टाचार करत आहेत. पंतप्रधान मोदी 'आप'ला वारंवार 'आपदा' नावानेच संबोधत होते.
अशी आहे आतापर्यंतची स्थिती -निवडणूक आयोगानुसार, दिल्लीतील ७० जागांपैकी भाजपला २३ जागांवर विजय मिळाला असून २४ जागांवर आघाडीवर आहे. तर गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवणारा आप (AAP) बहुमताच्या आकड्यापासून बराच दूर आहे. आतापर्यंत आपला ११ जागांवर विजय मिळाला आहे, तर १२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस शिवाय इतर पक्ष कुठेही दिसत नाहीत...