Delhi Vidhan Sabha Chunav 2025: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (१८ जानेवारी २०२५) आणखी एक मोठी घोषणा केली आहे. "आपण दिल्लीत वीज आणि पाणी मोफत देत आहोत. मात्र, भाडेकरूंना याचा लाभ मिळत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. पण मला वाटते की, भाडेकरूंनाही याचा फायदा मिळाला हवा.
यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.
'भाडेकरूंना मिळणार फ्री वीज-पाणी योजनेचा लाभ" -मोफत वीज आणि पाण्यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, दिल्लीकरांना २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळते. २०० ते ४०० युनिट्सपर्यंत अर्धेच शुल्क आकारले जाते. दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंना विविध कारणांमुळे त्याचे फायदे मिळत नाहीत. आता आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की जर भाडेकरू देखील दिल्लीचे रहिवासी असतील तर त्यांनाही मोफत वीज आणि पाणी मिळायला हवे. हे लक्षात घेऊन, आमच्या सरकारने अशी योजना आखली आहे की निवडणुकीनंतर आमचे सरकार भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाणी देईल.
आप प्रमुख केजरीवाल म्हणाले, "बहुतेक भाडेकरू बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून येतात. ते दिल्लीत गरिबीत राहतात. एका इमारतीत १०० लोक राहतात. एवढ्या गरिबीतही त्यांना वीज आणि पाणी सब्सिडीचा लाभ मिळत नाही. यामुळे त्रास होतो. आता सर्व भाडेकरूंनाही हा लाभ मिळेल."