नवी दिल्ली: यमुनेच्या पाण्यात हरयाणातील भाजप सरकार विषारी द्रव्य मिसळत असल्याचा गंभीर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल शुक्रवारी यावर खुलासा करण्यासाठी निवडणूक आयोगासमोर हजर झाले. आपली ही टिप्पणी यमुनेच्या पाण्यात अमोनियाच्या प्रचंड वाढलेल्या पातळीसंबंधी होती, असे केजरीवाल यांनी या खुलाशात नमूद केले आहे. आपल्या वक्तव्याबाबत काय शिक्षा द्यायची हे आयोगाने आधीच निश्चित केले असल्याचे नोटिसीतील भाषेवरून वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.
आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या. केजरीवाल यांनी हे आरोप केल्यानंतर भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी म्हणणे मांडले.
राजधानीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना यमुना नदीच्या विषारी पाण्यावरून हरयाणातील भाजप सरकारवर केजरीवाल यांनी केलेला आरोप अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. केजरीवाल यांनी आपल्या सहा पानी उत्तरात हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रचार काळात हरयाणा मुद्दाम यमुनेच्या पाण्यावरून राजकारण करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावेळी 'आप' नेत्यांसोबत यमुनेच्या पाण्याच्या तीन बाटल्याही घेऊन गेले होते.
काय म्हणाले होते केजरीवाल?
केजरीवाल हे २७ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत म्हणाले होते, 'हरयाणातील भाजप सरकारने यमुनेच्या माध्यमातून दिल्लीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळले आहे. दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्यांचे आभार अशासाठी की, त्यांनी वेळीच हे रोखले आणि पाणीपुरवठा थांबवला. अन्यथा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला असता.'
'हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार'
१५ जानेवारीला धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे • सांगितले होते. याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा यमुनेच्या पाण्यातील अमोनियाचे ३.२ पीपीएम (पार्टस पर मिलियन) प्रमाण २६-२७ जानेवारीपर्यंत ७ पीपीएमवर गेले होते.
याबाबत मुख्यमंत्री आतिशी व मान यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी जादा पाणी सोडण्याचे आश्वासन फक्त दिले आणि मुद्दाम दूषित पाणी दिल्लीसाठी सोडले.
या घटनाक्रमावरून असे दिसून येते की, याला हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
आता खुलासा असा केला...
मी यमुनेच्या प्रक्रिया होण्यापूर्वीच्या पाण्याबद्दल बोललो होतो. या पाण्यात अमोनियाची धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे सांगितले होते. त्याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहे.