आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर शनिवारी एका सभेदरम्यान दिल्लीमधील रोहिणी परिसरात हल्ला झाला. या घटनेनंतर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. तसेच निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपा हिंसाचार घडवत असल्याचा आरोप केला.
आम आदमी पक्षाचे उमेदवार मोहिंदर गोयल हे स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना ही घटना आज सकाळी ११ वाजता रोहिणी विभाग-११ मधील पॉकेट-एच परिसरात घडली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गोयल एका जुन्या व्हिडीओवर बोलत होते. त्यात आता हयात नसलेले एक स्थानिक रहिवासी दिसत होते. ही बाब जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा ते गोयल यांच्या सभेत दाखल झाले आणि त्यांनी गोयल यांना विरोध केला.
वाद वाढल्यावर दोन्ही पक्षांना धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही पक्षांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गोयल यांना कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर आम आदमी पक्षाचेचे आमदार गोयल हे काही वेळाने पट्ट्या बांधून आणि प्लॅस्टर घालून व्हिलचेअरवर बसून अरविंद केजरीवाल यांच्या सभेमध्ये हजर झाले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवरून आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, मोहिंदर गोयल यांची परिस्थिती पाहून मला रडू येत आहे. दिल्लीची जनता अशा प्रकारच्या गुंडगिरीला पाठिंबा देत नाही. भाजपा हिंसाचार करत आहे आणि पोलिस त्यांना वाचवत आहेत, असा सनसनाटी आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला.