ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२० - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील तिकीटवाटपावरुन दिल्ली भाजपामध्ये असंतोष खदखदू लागला आहे. मंगळवारी भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांना तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या उपाध्याय यांच्या समर्थकांनी दिल्लीतील पक्षकार्यालयाबाहेर गोंधळ घातला. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट पक्षाध्यक्ष अमित शहांविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी रात्री उशीरा भाजपाने ६२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आले आहे. रोहिणी मतदारसंघातून विजेंद्र गुप्तांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे स्थानिक नेते जय भगवान यांच्या समर्थकांनी रोहिणी परिसरात रास्ता रोको केला. तर दुपारी सतीश उपाध्याय यांच्या समर्थकांनी दिल्ली पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहांविरोधातच घोषणाबाजी सुरु झाल्याने सतीश उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'निवडणून न लढवण्याचा निर्णय मी माझ्या इच्छेने घेतल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे आव्हान मोडून काढण्यासाठी अमित शहा यांनी थेट किरण बेदींना निवडणुकीत उतरवून पक्षाला बळकट करण्याची रणनिती अवलंबली आहे. मात्र भाजपातील अंतर्गत संघर्षामुळे अमित शहांची डोकेदुखी वाढली आहे.