दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आम आदमी पार्टीने आपले लक्ष हॅट्रिक विजयावर केंद्रित केले आहे. भाजप 27 वर्षांचा दुष्टाकळ संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसचे लक्ष 2013 पासूनचा वनवास सपवण्यावर आहे. यातच, अरविंद केजरीवाल सातत्याने निवडणूक सभा घेऊन आपसाठी मते मागताना दिसत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, आपला पक्ष घराणेशाहीच्या विरोधात आहे. यामुळे आपली मुलं राजकारणात येणार नाहीत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल येणार आहेत.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपली मुलं राजकारणात येणार नाहीत. जर आलेच तर दुसऱ्या कुण्या पक्षातून येतील, आम आदमी पक्षात नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपली मुलं कधीच राजकारणात येणार नाहीत का? या प्रश्नावर बोलताना केजरीवाल म्हणाले, "आम्ही घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात आहोत. आमची मुलं राजकारणात येणार नाहीत. जर आलेच तर ते आम आदमी पार्टीत नसतील, कुण्या दुसऱ्या पक्षात असतील. घराणेशाहीचे राजकारण या देशाची मोठी समस्या आहे." अरविंद केजरीवाल यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुला शिकत आहे. तर मुलगी स्टार्टअपमध्ये आहे.
आम आदमी पक्ष फुटला का नाही? -यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी आपले जेल दरम्यानचे काही अनुभव शेअर केले. या पॉडकास्टमध्ये. आपण कारागृहात असताना आपल्या पत्नीने कुटुंबाबरोबरच पक्षही कशा पद्धतीने सांभाळला यासंदर्भात त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "सुनीता केजरीवाल यांनी पक्ष फुटू दिला नाही. मी कारागृहात असताना आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली नही, याचे 90 टक्के श्रेय त्यांनाच जाते. तेही राजकारणाचा कुठलाही प्रकारचा अनुभव नसताना. आपल्या पत्नीने पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. माझ्या पत्नीने मला आश्चर्यचकित केले. तिने खूप छान काम केले."