दिल्लीतील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. १५ नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली थर्ड फ्रंट पार्टी स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नगरसेवकांनी राजीनामा दिला असून 'इंद्रप्रस्थ विकास पक्ष' स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला. मुकेश गोयल या पक्षाचे लीडर असणार आहेत.
राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावं
हेमचंद गोयलदिनेश भारद्वाजरुनाक्षी शर्माहिमानी जैनउषा शर्मासाहिब कुमारराखी यादवअशोक पांडेमनीषाराजेश कुमार लाडीसुमन अनिल राणादेवेंद्र कुमारदिनेश भारद्वाज
मुकेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन गटात १५ नगरसेवक आहेत, जे आता इंद्रप्रस्थ विकास पक्षाचा भाग होतील. आम आदमी पक्षासाठी हे एक मोठं राजकीय आव्हान मानलं जात आहे. मुकेश गोयल आणि हेमचंद्र गोयल यांच्यासह अनेक नेते यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी हे लोक काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात सामील झाले होते. विधानसभा निवडणुकीत आदर्श नगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाने मुकेश गोयल यांना उमेदवारी दिली होती.
गेल्या महिन्यात झालेल्या एमसीडी निवडणुकीत भाजपाचे राजा इक्बाल सिंह महापौर झाले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मनदीप सिंग यांचा पराभव केला होता. आम आदमी पक्षाने या एमसीडी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 'आप'च्या या निर्णयावर पक्षाचे अनेक नेते नाराज असल्याचं मानलं जातं. आता अनेक आप नेत्यांचं बंड उघडपणे समोर आलं आहे.