दिवे घाटात दुचाकी घसरून एका व्यक्तीचा मृत्यू
By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST
सासवड : दिवे घाटात दुचाकी घसरल्याने रमेश विठ्ठल पिलाने यांचा मृत्यू झाला आहे.
दिवे घाटात दुचाकी घसरून एका व्यक्तीचा मृत्यू
सासवड : दिवे घाटात दुचाकी घसरल्याने रमेश विठ्ठल पिलाने यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लालासाहेब ज्ञानदेव पिलाने (वय ३४, रा. सहारा गोल्ड, ए विंग, प्लॉट नं. १०, सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण असले, तरी रस्त्यावर साचलेल्या पाणी आणि चिखलावरून दुचाकी घसरून एकास प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेतील मयत रमेश विठ्ठल पिलाने (वय ५१, रा. तक्रारवाडी) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी एमएच १२ जीजी ३८१९ घेऊन रविवार, दि. १३ रोजी सायंकाळी सासवडवरून दिवे घाटातून हडपसरकडे सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान जात होते. त्याचवेळी नुकताच पाऊस पडल्याने रस्त्यावर चिखल आणि माती साचली होती. त्यामुळे घाटातील पहिल्याच वळणावर त्यांची दुचाकी रस्त्यावरून अचानक घसरून ते खाली पडले. तसेच, त्यांच्या डोक्यास जबर मार लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. महाजन हे पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस फौजदार अ. अ. निकाळजे यांनी दिली.