महासभेचा निर्णय गाळेधारकांच्या बाजूने महापालिका: आहे त्याच गाळेधारकांना मिळणार गाळा
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
अहमदनगर: सावेडीत उभारण्यात येणार्या वीज उपकेंद्रासाठी दोन एकर जागा देण्याचा तसेच सत्ताधारी-विरोधकांत समेट घडविण्याच्या मनसेच्या भूमिकेमुळे गाळेधारकांच्या विषयाला त्यांच्या बाजूने मंजुरी देण्याचा निर्णय महापौर अभिषेक कळमकर यांनी जाहीर केला. याशिवाय महासभेने गणेशोत्सवासंदर्भातील प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत अन्य विषयांना मंजुरी दिली.
महासभेचा निर्णय गाळेधारकांच्या बाजूने महापालिका: आहे त्याच गाळेधारकांना मिळणार गाळा
अहमदनगर: सावेडीत उभारण्यात येणार्या वीज उपकेंद्रासाठी दोन एकर जागा देण्याचा तसेच सत्ताधारी-विरोधकांत समेट घडविण्याच्या मनसेच्या भूमिकेमुळे गाळेधारकांच्या विषयाला त्यांच्या बाजूने मंजुरी देण्याचा निर्णय महापौर अभिषेक कळमकर यांनी जाहीर केला. याशिवाय महासभेने गणेशोत्सवासंदर्भातील प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत अन्य विषयांना मंजुरी दिली. महापौर अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली महासभेस दुपारी एक वाजता सुरूवात झाली. उपमहापौर सुवर्णा कोतकर, आयुक्त विलास ढगे, आमदार संग्राम जगताप, सभागृह नेते कुमारसिंह वाकळे सभागृहात उपस्थित होते. सुरूवातीलाच असणार्या मागील इतिवृत्त कायम करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकात वादावादी झाली. त्यानंतर शहर हागणदारीमुक्त करण्याकरीता वैयक्तिक शौचालय बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचा विषय चर्चेला आला. चर्चेनंतर महापालिकेचे आर्थिक हित पाहून मनपाने प्रती शौचालय अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत वाढीव अनुदान मागणीच्या प्रस्तावावरही विरोधक-सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आयुक्त ढगे यांच्या स्पष्टीकरणानंतर हा विषय मंजूर करण्यात आला.सिध्दीबाग, सर्जेपुरा येथील गाळेधारकांचा विषय चर्चेला येताच नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी न्यायालयीन मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर कळमकर यांनी विधीज्ञ प्रसन्ना जोशी यांना कायदेशीर खुलासा करण्याचे सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेला सुरूवात झाली. सेनेचे अनिल शिंदे, सचिन जाधव, विक्रम राठोड, दीप चव्हाण यांनी प्रशासनाने राबविलेल्या कार्यवाहीचा पंचनामा केला. श्रेय वादावरून मग सत्ताधारी व विरोधकात जुंपली. अखेर मनसेचे किशोर डागवाले, कैलास गिरवले यांनी सभागृहातील प्रत्येक सदस्यांची भावना ही आहे त्याच गाळेधारकांना गाळा मिळावा अशी असल्याचे सांगत विरोधक-सत्ताधारी यांच्यात समेट घडवून आणला. डागवाले यांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून त्याला सत्ताधारी गटाचे आमदार संग्राम जगताप यांची मान्यता घेतली. आहे त्याच गाळेधारकांकडून रेडीरेकनरनुसार भाडे आकारणी करून सहा महिन्याचे भाडे अनामत म्हणून घ्यावे. प्रशासनाने दिलेल्या नोटिसा रद्द ठरवून गाळेधारकांनी कोर्टातील केसेस मागे घ्याव्यात, जे केस मागे घेणार नाहीत त्याच्याविरोधात प्रशासनाने कारवाई करावी असा निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर अभिषेक कळमकर यांनी तसा निर्णय दिला, मात्र प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळे वगळून असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा चर्चा सुरू केली. नंतर कायदेशीर बाबी तपासून सगळ्याच गाळेधारकांचा निर्णय घेऊ असे कळमकर यांनी स्पष्ट केले. (चौकट जोड आहे)