ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीने तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दाऊद कराचीत दिसत नसून तो भूमिगत झाला आहे अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिका-याने दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यादरम्यान दहशतवादा रोखण्यासंदर्भात दोन्ही देशांनी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याबद्दल करार झाला होता. तसेच दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठीही दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच घाबरलेल्या दाऊदने ही हालचाल केल्याचे समजते.
डी-कंपनीच्या हालचालींवर नजर ठेऊन असणा-या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद कराचीत दिसत नाहीये, तसेच आपल्या निकटवर्तीयांशीही त्याने कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही. आयएसआयच्या मतदीने त्याने कराचीतून पळ काढला असून पाक-अफगाण बॉर्डरवर एका सुरक्षित स्थळी तो लपला आहे.