मुंगेर (बिहार) : जनता दलाचे (संयुक्त) आमदार मेवालाल चौधरी, त्यांची पत्नी नीता हे गॅस सिलिंडरच्या स्फोटात गंभीररीत्या भाजले. नीता चौधरी याही माजी आमदार आहेत.मुंगेर जिल्ह्यात ही दुर्घटना सोमवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नीता चौधरी या ९० टक्के भाजल्या असून, मृत्यूशी झुंज देत आहेत. मेवालाल चौधरी यांचे हात भाजले आहेत, असे मुंगेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी शंकर कुमार यांनी सांगितले. चौधरी यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, चौधरी दाम्पत्य मध्यरात्री गॅसचा वास आल्यामुळे जागे झाले. त्यांनी स्वयंपाकघरातील लाईट लावताच सिलेंडरचा स्फोट झाला. तथापि, स्फोटाचे कारण संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे कुमार यांनी सांगितले.कुमार यांनी सांगितले की, जखमी जोडप्याला भागलपूर येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी नीता चौधरी यांना पाटण्याला हलवण्यास सांगितले. नीता चौधरी यांना पाटण्याहून विमानाने हलवण्यात आल्याचे आम्हाला समजले आहे.मेवालाल चौधरी हे मुंगेरमधील तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. याच मतदारसंघातून नीता चौधरी यादेखील निवडून गेल्या होत्या. (वृत्तसंस्था)
सिलिंडर स्फोट; आमदार पत्नी गंभीर, मध्यरात्री गॅसगळतीनंतर स्फोटाने परिसर हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 04:32 IST