नौदलाच्या औषधखरेदीत कोटींचा घोटाळा
By admin | Published: July 18, 2015 05:07 AM2015-07-18T05:07:39+5:302015-07-18T05:07:39+5:30
भारतीय नौदलाचे मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ हे इस्पितळ आणि त्याच्याशी संलग्न आस्थापनांमध्ये औषधे व अन्य सामग्रीच्या खरेदीत झालेला मोठा घोटाळा केंद्रीय गुन्हे
- नबिन सिन्हा, नवी दिल्ली
भारतीय नौदलाचे मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ हे इस्पितळ आणि त्याच्याशी संलग्न आस्थापनांमध्ये औषधे व अन्य सामग्रीच्या खरेदीत झालेला मोठा घोटाळा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणला आहे.
‘अश्विनी’ इस्पितळ नौदलाचे असले तरी त्याच्या सेवा अन्य सेनादलांनाही उपलब्ध आहेत. संरक्षण दलांच्या इतरही महत्त्वाच्या इस्पितळांमध्येही असाच घोटाळा झाला असल्याची शक्यताही ‘सीबीआय’ तपासून पाहात आहे. ‘सीबीआय’च्यासूत्रांनी सांगितले की, मिळालेल्या तक्रारींवरून नौदल आणि लष्करातील तज्ज्ञांना सोबत घेऊन आमच्या अधिकाऱ्यांच्या दोन तुकड्यांनी शुक्रवारी मुंबईत कुलाबा येथील ‘आयएनएस अश्विनी’ हे इस्पितळ आणि कांदिवली येथील सुरक्षा दलांचा मेडिकल स्टोअर्स डेपो येथे जाऊन तेथील रेकॉर्डची अचानक तपासणी केली. हे वृत्त देईपर्यंतही या तुकड्यांचे तपासणीचे काम सुरू होते.
सूत्रांनी सांगितले की, दर करारानुसार मंजूर असलेल्या यादीतील पुरवठादारांकडून औषधांची खरेदी करण्याऐवजी ती अव्वाच्या सव्वा भावाने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात असल्याचे या तपासणीत आढळून आले.
सुरक्षा दलांच्या इस्पितळांमध्ये एका वेळी किती औषधे खरेदी करावीत व त्यांचा किती प्रमाणात साठा असावा याची निश्चित अशी ‘स्टॉक पॉलिसी’ ठरलेली आहे. सूत्रांनुसार शुक्रवारच्या तापसणीत या पॉलिसीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
तज्ज्ञांची तुकडी
गरजेपेक्षा जास्त औषधांची खरेदी करून त्यांचा साठा केला गेला. परिणामी, मुदत संपल्याने ही औषधे वाया गेली व मोठे आर्थिक नुकसान झाले. हे गैरप्रकार ‘आयएनएस अश्विनी’ व कांदिवली डेपोपुरतेच मर्यादित आहेत की सैन्यदलांच्या इतर प्रमुख इस्पितळांमध्येही असेच प्रकार सुरू आहेत याची खातरजमा करण्यासाठी सैन्यदलांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांची एक संयुक्त तुकडी तयार करून विविध इस्पितळांच्या रेकॉर्डची तपासणी तसेच औषधसाठ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.